राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं- पर्रिकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 07:51 PM2018-07-16T19:51:47+5:302018-07-16T19:55:05+5:30
मनोहर पर्रिकर यांची राहुल गांधींवर खोचक टीका
पणजी : राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं. मग त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास बसला असता, अशी उपहासात्मक टीका माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी केली. भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक केला, यावर विरोधी पक्ष विश्वास ठेवत नव्हता. आम्ही त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना लष्करासोबत सर्जिकल स्ट्राईकसाठी पाठवायला हवं होतं, असं पर्रिकर म्हणाले.
'सर्जिकल स्ट्राईकची प्रक्रिया व नियोजन हे खूप गुप्त ठेवावं लागतं. त्याविषयी कुणाला पूर्वकल्पना देता येत नाही. पण आम्ही जर लष्करासोबत राहुल गांधी यांना पाठवलं असतं, तर काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राईक झाला यावर विश्वास ठेवला असता ना?,' असा प्रश्न पर्रिकरांनी उपस्थित केला. 'मी सर्जिकल स्ट्राईकविषयी राजकीय अर्थानं बोलत नाही. मात्र या ऑपरेशनवर विश्वास बसण्यासाठी विरोधी पक्षातील लोकांना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करानं सोबत न्यायला हवं होतं का?' अशी विचारणा पर्रिकर यांनी केली. 'सर्जिकल स्ट्राईकची माहिती फक्त चौघांनाच होती. मी, पंतप्रधान मोदी, लष्कर प्रमुख व मिलिटरी ऑपरेशनचे डायरेक्टर जनरल यांनाच या ऑपरेशनची पूर्वकल्पना होती. सशाच्या शिकारीसाठी जाताना वाघाच्या शिकारीची तयारी करून जावं लागतं. प्रसार माध्यमांनी याचा चुकीचा अर्थ काढू नये,' असं पर्रिकर म्हणाले.
'केंद्रात पुन्हा मोदी सरकार यायला हवं. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते गरजेचं आहे. विरोधक अल्पसंख्यांकांमध्ये अकारण भीती निर्माण करत आहेत. मुस्लिम मतदारही भाजपसोबत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ते दिसून आलं आहे. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल. सोशल मिडियावरून मोदींविषयी जो अपप्रचार काहीजण करत आहेत, त्याला उत्तर द्यायला हवं. मोदींच्या राजवटीमुळे गेल्या चार वर्षात तीन राज्यांत दीड कोटी रोजगार संधी निर्माण झाल्या,' असं पर्रिकर यांनी नमूद केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी म्हणून भाजपच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पणजी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पर्रिकर बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दामू नाईक आदी यावेळी व्यासपीठावर होते.