राहुल गांधींनाच काँग्रेसचं अध्यक्ष करा; राजस्थान युनिटने मंजूर केला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 12:55 PM2022-09-18T12:55:28+5:302022-09-18T12:58:16+5:30
ऑक्टोबर माहिन्यात होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक
Congress President Election, Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याचा ठराव पक्षाच्या राज्य संघटनांनी मंजूर केल्याची चर्चा आहे. यामध्ये सर्वप्रथम राजस्थान युनिटमध्ये अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे.
राजस्थान काँग्रेस युनिटचा राहुल यांना पाठिंबा!
राजस्थान काँग्रेसने शनिवारी राहुल गांधी यांना पक्षप्रमुख करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचेही नाव चर्चेत आले होते. मात्र आता जयपूर येथे झालेल्या सभेत राहुल यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर पक्षाचे नेतृत्व राहुल गांधींच्या हाती असावे, अशी पक्षातील दिग्गज नेत्यांची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थानचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी माहिती दिली की, ठराव मंजूर होण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. पक्षाच्या सदस्यांना काय हवे आहे, याबाबतही त्यांनी मते विचारात घेतली. त्यानंतर सर्वानुमते गेहलोत यांच्या मुद्द्याला दुजोरा आणि पाठिंबा देण्यात आला.
अशा प्रस्तावांच्या काही उपयोग नाही!
विशेष म्हणजे, अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेसच्या काही नेत्यांनी म्हटले होते की, गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाच्या काही राज्य युनिट्सकडून ठराव मंजूर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याच वेळी काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनीही म्हटले होते की, जर कोणाला पीसीसी काँग्रेस (राष्ट्रीय) अध्यक्षाबाबत ठराव मंजूर करायचा असेल तर ते करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. या अहवालांच्या दरम्यान, राहुल यांच्या बाजूने असा ठराव पारित करणारे राजस्थान हे काँग्रेसचे पहिले राज्य आहे. पण अशा पाठिंब्याचा पुढील महिन्यात होणाऱ्या पक्षाध्यक्ष निवडणुकीवर थेट परिणाम होणार नसल्याचे सध्या पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून १७ ऑक्टोबरला मतदान तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याआधी २२ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे.