राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा,मागणीसाठी सुशीलकुमारांचीच आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 11:07 PM2019-07-01T23:07:50+5:302019-07-01T23:15:31+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्यापराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
राजा माने
मुंबई - काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधी तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच, खुद्द राहुल गांधी यांनीच आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते कामाला लागले असून या नेत्यांच्या यादीत सुशीलकुमार हे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे सुशीलकुमार यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्यापराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल यांचा राजीनामा नाकारला. राहुल गांधी मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. राहुल गांधी राजीनामा मागे घेण्यासाठी तयार नसल्याने अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर आली. त्यात सर्वप्रथम राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव समोर आले होते. मात्र नंतर हे नाव मागे पडले. त्यातच आता सुशीलकुमार यांचे नाव निश्चित झाले असल्याच्या बातम्या माध्यमात आल्या. मात्र अध्यक्षपदा बाबत पक्षश्रेष्ठींशी आपले कोणतेही बोलणे झाले नसल्याचा खुलासा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.
वास्तविक पाहता राहुल गांधी यांनीच अध्यक्ष म्हणून राहावे अशी भावना काँग्रेसच्या नेत्यांची आणि आपली असल्याचे शिंदे म्हणाले. तर राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी आघाडी उभारली असून याचे नेतृत्व खुद्द सुशीलकुमार शिंदे करत असल्याचे समजते. तर संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार असून त्यानंतरच काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी की सुशीलकुमार शिंदे हे स्पष्ट होणार आहे.