'मी दोन मुद्दे उपस्थित केले आणि संपूर्ण मीडिया माझ्याविरोधात गेला' - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 06:29 PM2022-12-04T18:29:59+5:302022-12-04T18:30:09+5:30
'मीडिया 24 तास माझ्यासाठी वाह-वाह करायचा. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी खर्च केले.'
Rahul Gandhi: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राजकारणातील सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सुरुवातीची 5-6 वर्षे देशातील प्रसारमाध्यमे त्यांची खूप प्रशंसा करत होते. परंतु त्यानंतर सर्वकाही बदलले, अशी भावना राहुल यांनी व्यक्त केली. 'माझ्या मीडिया इमेजचे सत्य काय?', या कॅप्शनसह राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला.
हे दोन मुद्दे उपस्थित केले
व्हिडिओमध्ये राहुल म्हणाले, “मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा 2008-09 पर्यंत देशातील संपूर्ण मीडिया माझ्यासाठी 24 तास 'वाह, वाह' करायचे. मग मी नियामगिरी आणि भट्टा-परसौल, हे दोन मुद्दे मांडले आणि सर्व काही बदलले. मी जमिनीचा मुद्दा उचलून धरला आणि गरीब लोकांचे रक्षण करू लागलो, तेव्हा संपूर्ण मीडियाने माझ्या विरोधात जाऊन तमाशा सुरू केला," अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
मेरी मीडिया छवि का असली सच क्या है? https://t.co/PW4ZZqIN8bpic.twitter.com/IX9Lp91FgE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 4, 2022
माझी प्रतिमा डागाळण्याचे काम भाजपचे
ते पुढे म्हणाले, "आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणला आणि त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी इतर कायदेही आणले. त्यानंतर मीडियाने 24 तास माझ्या विरोधात लिहायला सुरुवात केली. भारताची संपत्ती(राजे महाराजांची संपत्ती) होती ती राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेला देण्यात आली होती, पण भाजप याच्या उलट करत आहे. तीच संपत्ती ते 'महाराजांना' परत देत आहेत. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले,' असा आरोपही राहुल यांनी केला.
ते दोन मुद्दे कोणते?
ओडिशातील वेदांताच्या खाणकामासाठी नियामगिरीच्या भूसंपादनाला राहुल गांधींनी विरोध केला होता. त्यांनी ते बेकायदेशीर म्हटले आणि नंतर ते बंद केले. 2011 मध्ये उत्तर प्रदेशातील भट्टा, परसौल येथे भूसंपादनावरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा विरोध दिसून आला. तत्कालीन मायावती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी भेट दिली होती आणि राहुल गांधींच्या राजकारणातील प्रवासातील हा एक लोकप्रिय प्रसंग होता.