काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:33 AM2019-05-28T10:33:27+5:302019-05-28T10:34:38+5:30
काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी रिकामे सोडणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल पक्षाला वेळ देणार असल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयात युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आहेत.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांचा राजीनामा एकमुखाने नाकारण्यात आला आहे. मात्र अजुनही ते आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी राहुल यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यातिथीनिमित्त ट्विटवरून श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, भारतसोबत अनेक देश स्वतंत्र झाले होते. त्यापैकी अनेक देशात हुकूमशाही आली. मात्र नेहरू यांच्यामुळे आपण मजबूत लोकशाही निर्माण केली. स्वतंत्र आणि आधुनिक संस्थांची निर्मिती केली. त्यामुळे देशात ७० वर्षांपासून लोकशाही मजबूत झाली, असही राहुल म्हणाले.
ट्विटर हॅडलवर राहुल अजुनही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. मात्र ट्विटवर अजुनही राहुल राष्ट्रीय अध्यक्ष दिसत असल्यामुळे अनेक नेत्यांना हायस वाटत आहे. परंतु, राहुल आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, अध्यक्षपद राहुल गांधी रिकामे सोडणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. तसेच नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल पक्षाला वेळ देणार असल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयात युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आहेत.
दुसरीकडे राहुल गांधी सध्या कुणालाही भेटत नसल्याचे समजते. विजयी खासदारांनी राहुल यांच्याशी संपर्क केला. परंतु, राहुल यांनी भेटण्यास नकार दिला. त्यानंतर राहुल यांच्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सोमवारी राहुल यांनी काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते केसी वेनुगोपाल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली. यावेळी राहुल यांनी दोन्ही नेत्यांना अध्यक्षपदासाठी पर्याय शोधण्याच्या सूचना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.