'पंतप्रधान मोदी चीनच्या पुलाचंही उदघाटन करतील याचीच भीती'; राहुल गांधींचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:31 PM2022-01-19T18:31:13+5:302022-01-19T18:32:29+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेच्याजवळ (LAC) लडाखच्या पेंगाँग त्सो सरोवरावर अनधिकृतरित्या पुलाचं बांधकाम केलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली-
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेच्याजवळ (LAC) लडाखच्या पेंगाँग त्सो सरोवरावर अनधिकृतरित्या पुलाचं बांधकाम केलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. चीनकडून केल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधी यांनी याआधी उपस्थित केला होता. आता राहुल गांधी यांनी चीनच्या अनधिकृत कारनाम्याचा फोटोच जारी करत केंद्र सरकार आणि विशेषत: मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून लडाखमध्ये पेंगाँग सरोवरावर चीनकडून पूल बांधला जात असल्याचा एक फोटो ट्विट केला आहे. चीनच्या कारनाम्यांवर मोदींनी साधलेल्या मौनव्रतामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीला अतिक्रमण करण्यासाठीचं प्रोत्साहनच मिळत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच आता आपले पंतप्रधान कदाचित चीनच्या या पुलाचंही उदघाटन करतील की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे, असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे.
हमारे देश में चीन एक कूटनीतिक पुल का निर्माण कर रहा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 19, 2022
PM की चुप्पी से PLA के हौसले बढ़ते जा रहे हैं।
अब तो ये डर है कहीं PM इस पुल का भी उद्घाटन करने ना पहुँच जायें। pic.twitter.com/OMcCC3wxXD
चीनकडून पेंगाँग सरोवरावर एका पुलाचं बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचं ४०० मीटरहून अधिक बांधकाम पूर्ण देखील झालं आहे. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर चीनला संबंधित परिसरात प्राबल्य वाढवता येईल असं सांगितलं जात आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील एक महत्त्वपूर्ण बिंदू ठरणारं हे ठिकाण असल्याचं देखील म्हटलं जात आहे. चीन बांधत असलेला पूल ८ मीटर रुंद असून पेंगाँगच्या उत्तर तटावर असलेल्या चीनी सैन्याच्या फिल्ड बेसपासून दक्षिणेकडे याचं निर्माण कार्य सुरू आहे. याची ठिकाणी २०२० साली भारत आणि चीनमध्ये होणारी बाचाबाची व तणाव लक्षात घेता सैनिकांना राहण्यासाठी तात्पुरते तंबू बांधण्यात आले होते. तसंच प्राथमिक उपचार केंद्र देखील उभारण्यात आली होती.