'...तर मी तुमच्या पाठीला नाक पुसतोय, असे ते म्हणतील', राहुल गांधींची माध्यमांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 04:24 PM2023-03-24T16:24:48+5:302023-03-24T17:16:38+5:30
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने अपात्रतेची कारवाई केली आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाने अपात्रतेची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर काँग्रेसच्या गोटातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातला एक संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राहुल गांधींनी खर्गेंना विधानभवनाच्या पायऱ्या उतरताना मदत केली. यावरुन त्यांनी माध्यमांवर खोचक टीका केली.
एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, संसदेच्या आवारातील पक्ष कार्यालयातून राहुल गांधी आणि खर्गे बाहेर पडत होते. यावेळी राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पायऱ्या उतरण्यास मदत केली. यावेळी राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गेंना म्हणाले, "मी तुम्हाला स्पर्श केला तर ते म्हणतील, मी माझे नाक तुमच्या पाठीवर पुसत आहे. निव्वळ मूर्खपणा. तुम्ही ते पाहिलं का? मी तुम्हाला मदत करत होतो आणि ते म्हणाले की, मी तुमच्या पाठीवर नाकातला हात पुसतोय."
राहुलसोबत सोनिया गांधीही दिसल्या
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेसने आज संध्याकाळी आपल्या सुकाणू समितीचे सदस्य, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि आघाडीच्या संघटना प्रमुखांची बैठक बोलावली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली जात आहे.
"If I touch you, they say I'm wiping my nose on your back": Rahul Gandhi tells Kharge
— ANI Digital (@ani_digital) March 24, 2023
Read @ANI Story | https://t.co/7WkPhHtPLB#RahulGandhi#MallikarjunKharge#Congresspic.twitter.com/0wIPyMk3R9
कोणत्या प्रकरणात राहुल गांधींवर कारवाई?
गुरुवारी सुरतच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी' आडनावबद्दल केलेल्या टीकेवरुन दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना तात्काळ जामीनही देण्यात आला. एप्रिल 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथे लोकसभा निवडणुकीच्या सभेत "सर्व चोरांना मोदी हेच आडनाव कसे ?" असे राहुल म्हणाले होते. यानंतर भाजप आमदाराने त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.