बिहार निकालानंतर राहुल गांधी २ दिवसांच्या सुट्टीवर, मित्रांसह जैसलमेर दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 11:26 AM2020-11-11T11:26:19+5:302020-11-11T11:27:01+5:30
rahul gandhi : राहुल गांधी पहिल्या दिवशी येथील सूर्यगड किल्ल्यावर मुक्काम करतील आणि दुसर्या दिवशी वाळवंटात तंबूत राहणार आहेत.
जयपूर : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या मित्रांसह सुट्टीसाठी बुधवारी जैसलमेरला पोहोचले आहेत. राहुल गांधी जैसलमेरमध्ये दोन दिवस मुक्काम करणार आहेत. यासाठी तयारी सुरू आहे. येथील प्रशासनाला दहा लोकांच्या व्हीआयपी मूव्हमेंटची तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राहुल गांधी पहिल्या दिवशी येथील सूर्यगड किल्ल्यावर मुक्काम करतील आणि दुसर्या दिवशी वाळवंटात तंबूत राहणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम सोमवारी ठरविण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी पहाटे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी खासगी विमानाने जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ जैसलमेर येथे दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांचा हा दौरा अतिशय गुप्त ठेवला जात आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली असून त्यांचे सीआरपीएफचे सुरक्षा पथक जैसलमेरला पोहोचले आहे. तसेच, राहुल गांधींनी येथील स्थानिक काँग्रेस नेत्यांना आपले स्वागत करण्यास नकार दिला आहे. याशिवाय, हॉटेल परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी बुधवारी पहाटे नवी दिल्लाहून साडे सहा वाजता जैसलमेरच्या विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरून राहुल गांधी हे साम रोड येथील पंचतारांकित हॉटेल सूर्यगड किल्ल्याकडे रवाना झाले. जैसलमेरमध्ये राहुल गांधी एक रात्र वाळवंटातील तंबूत घालवणार आहे. यासाठी खास तंबू बनविण्यात येत आहेत. याचबरोबर, राहुल गांधी आपल्या या प्रवासादरम्यान उंट सवारी करतील. राजस्थानी पारंपारिक लोक संगीत नृत्याचा आनंद घेतील.
राहुल गांधींचा हा दौरा गोपनीय असणार आहे. मंगळवारी राहुल गांधींचे सुरक्षा पथक जैसलमेरला पोहोचल्यानंतर त्यांनी हॉटेलला भेट दिली आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही संभाव्य मुक्काम असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, शुक्रवारी राहुल गांधी हे नवी दिल्लीला परतणार आहेत.