काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध, घोषणा ११ डिसेंबर रोजी; दिल्लीत भव्य समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:02 AM2017-12-06T05:02:15+5:302017-12-06T05:02:31+5:30
राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि तिला कोणी आव्हान देऊ नये
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि तिला कोणी आव्हान देऊ नये, यासाठी निवडीची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे.
घोषणा झाल्यानंतरच राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यानिमित्ताने दिल्लीत मोठा समारंभ होणार आहे. देशभरातील काँग्रेस नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील निवडणुका संपल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल.
काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते अर्थातच राहुल गांधी यांच्या नावाचे होते. सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, राहुल गांधी यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यांच्याशिवाय कोणीही या पदासाठी अर्ज केला नव्हता.
काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणार ते घरातील सहावे अध्यक्ष असतील.