राहुल गांधींनी रिकामा केला बंगला, सामानाचा ट्रक निघाला; सोनिया गांधींच्या घरी शिफ्ट होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 05:30 PM2023-04-14T17:30:59+5:302023-04-14T17:57:36+5:30
Rahul Gandhi Vacating House: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आपला सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती.
Rahul Gandhi Vacating House: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आपलं निवासस्थान रिकामं करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (14 एप्रिल) त्यांच्या घरातून सामान भरलेला ट्रक बाहेर पडताना दिसला. ही सामानाची पहिली खेप आहे की शेवटची, याबाबत माहिती मिळालेली नाही.
#WATCH | Trucks at the premises of Delhi residence of Congress leader Rahul Gandhi. He is vacating his residence after being disqualified as Lok Sabha MP. pic.twitter.com/BZBpesy339
— ANI (@ANI) April 14, 2023
राहुल गांधी इतक्या वर्षांपासून दिल्लीतील 12 तुघलक लेनमधील बंगल्यात राहायचे. आता हा बंगला रिकामा केल्यानंतर ते आई आणि यूपीए चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ रोडवरील घरात शिफ्ट होणार आहेत.
मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेप्रकरणी राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी सुरत न्यायालयानं दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. हाऊस कमिटीने 27 मार्च रोजी राहुल गांधींना एक महिन्याच्या आत घर रिकामे करण्याची नोटीस दिली. त्यामुळे आता त्यांनी घर रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी सूरत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. 20 एप्रिल रोजी त्यावर निर्णय येईल.
राहुल गांधींची केंद्रावर टीका...
बुधवारी केरळमधील वायनाड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, '50 वेळा माझे घर जप्त करा, पण मी जनतेचे प्रश्न मांडत राहीन. तुम्ही लोकांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्यासाठी लढेन. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. अदानीबाबत मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचराल, पण त्यांनी उत्तर दिले नाही.'