"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात"

By मुकेश चव्हाण | Published: October 6, 2020 11:53 AM2020-10-06T11:53:55+5:302020-10-06T11:55:38+5:30

केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

"Rahul Gandhi is a VIP farmer, he also sits on a sofa on a tractor." | "राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात"

"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात"

Next

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयकं मांडली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ही विधेयकं लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. मात्र या कृषी विषयक विधेयकांवरून शेतकरी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान आता काँग्रेसने देखील पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'शेती वाचवा' अभियान सुरू झाले आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत.

राहुल गांधी रविवारी एका ट्रॅक्टरवर बसून शेती वाचवा यात्रेत सहभागी होऊन या यात्रेची सुरुवात केली होती. तसेच तीन कृषीविषयक कायद्यांद्वारे मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन आणि त्यांच्या जेवणाचा घासच काढू पाहत आहे. पण, आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. काँग्रेस सत्तेत येताच हे तिन्ही शेतकरीविरोधी कायदे कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात येतील, अशी घोषणाही राहुल गांधी यांनी केली आहे.मात्र राहुल गांधी यांच्या या शेती वाचवा आंदोलनावरुन भाजपाने निशाणा साधला आहे.

नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये राहुल गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह मोर्चामधील ट्रॅक्टरवर बसले होते. यावरुन आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी VIP शेतकरी आहेत. ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात, असं स्मृती इराणी यांनी सांगितले.

अनिल विज म्हणाले, राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात येऊ देणार नाही-

राहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप हरयाणामध्ये होणार आहे. कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे. या मोहिमेदरम्यान राहुल गांधी खेड्यांमधील शेतकऱ्यांना भेटतील. या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे तीन हजार शेतकरी सहभाग घेतला आहे. या रॅलीवरून हरयाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड़ यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली घ्यायची असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड़ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्राशी संबंधित, शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) दर हमी विधेयक २०२०, ही दोन विधेयके आवाजी मतदानाने राज्यसभेत देखील मंजूर करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना, हा भारतीय कृषी इतिहासातील महत्वाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. तसेच एमएसपी व्यवस्था सुरूच राहील, असे आश्वासनही नरेंद्र मोदींनी दिले आहे. तसेच अनेक दशकांपासून आपले शेतकरी बांधव, अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना दलालांचा समना करावा लागत होता. आता ही विधेयके संसदेत मंजूर झाल्याने, या सर्वांतून शेतकऱ्यांची मुक्ती झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल," असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

Web Title: "Rahul Gandhi is a VIP farmer, he also sits on a sofa on a tractor."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.