खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाड दौऱ्यावर, प्रियांका गांधीही सोबत असणार; असा आहे प्लॅन...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:06 AM2023-04-11T11:06:11+5:302023-04-11T11:13:13+5:30
Rahul Gandhi : वायनाड दौऱ्यात राहुल गांधी कलपेट्टा-कायनाट्टी येथील एका शाळेत 'जनसंपर्क' कार्यक्रमात सहभागी होतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील.
नवी दिल्ली. संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज पहिल्यांदाच त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाड (केरळ) येथे जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायनाड दौऱ्यात राहुल गांधी कलपेट्टा-कायनाट्टी येथील एका शाळेत 'जनसंपर्क' कार्यक्रमात सहभागी होतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. यावेळी त्यांची बहीण प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) त्यांच्यासोबत असणार आहेत.
लोकसभेची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी वायनाड मतदारसंघातील लोकांना भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी राहुल गांधी कलपेट्टा येथे रोड शो देखील करणार आहेत. एसकेएमजे उच्च माध्यमिक विद्यालयापासून दुपारी 3 वाजता रोड शो सुरू होईल, असे स्थानिक वृत्तात म्हटले आहे. या रोड शोमध्ये लोकसभा मतदारसंघातील विविध भागातून हजारो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, तारिक अन्वर, विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, केपीसीसीचे अध्यक्ष के सुधाकरन, मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष पनक्कड सय्यद सादिक अली शिहाब थंगल, पीके कुन्हालीकुट्टी, एनके प्रेमचंद्रन, सीपी जॉन आणि इतर अनेक नेते सहभागी होणार आहे. तसेच, यावेळी रोज शोमध्ये पक्षाच्या झेंड्याऐवजी राष्ट्रध्वजाचा वापर कार्यकर्ते करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी वायनाडमधूनच 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. दुसरीकडे अमेठीच्या जुन्या जागेवरून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये 4.31 लाख मतांनी विजय मिळवला होता. दरम्यान, वायनाड संसदीय जागेचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने 2019 च्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे.