Rahul Gandhi: "भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडलं होतं’’, अमेरिकेतून राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 05:10 PM2023-05-31T17:10:46+5:302023-05-31T17:11:40+5:30
Rahul Gandhi: सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडत होतं.
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडत होतं. या विरोधात प्रेमानं लढावं लागेल. सॅन फ्रान्सिस्को येथे मोहब्बक की दुकान या कार्यक्रमात बे एरिया मुस्लिम कम्युनिटीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आरोप केला की, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काही कामाचा प्रभाव अल्पसंख्याक आणि दलित, आदिवासी समुदायाच्या लोकांना जाणवत आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, मुस्लिमांना हा प्रभाव प्रत्यक्षपणे जाणवत आहे. कारण ही गोष्ट त्यांच्यासोबत अधिक प्रमाणात घडत आहे. मात्र वास्तवात हे सर्व समुदायांसोबत घडत आहे. ज्याप्रकारे मुस्लिम स्वत:वरील हल्ला अनुभवत आहेत. मी हमखास सांगतो की, शीख, ख्रिश्चन, दलित आणि आदिवासीसुद्धा अशा प्रकारचा हल्ला अनुभवत आहेत. तुम्ही द्वेशाला द्वेशाने संपवू शकत नाही तर प्रेम आणि स्नेहाने संपवू शकता. जर तु्म्ही ८० च्या दशकात उत्तर प्रदेशात गेला असाल तर तेव्हा अशा घटना दलितांसोबत घडत होत्या, हे आपणास माहित असेल. आपण याला आव्हान दिलं पाहिजे. त्याविरोधात लढलं पाहिजे. तसेच हा लढा द्वेशाने नव्हे तर प्रेमाने दिला पाहिजे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या भारत आणि जगभरातील लोकशाही मूल्यांबाबत कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी आणि अनिवासी भारतीयांसोबत संवाद साधण्यासाठी अमेरिकेच्या सहा दिवसीय दौऱ्यावर आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आर्थिक असमानतेबाबत भाष्य केलं. तिथे त्यांनी सांगितलं की, काही लोकांना उदरनिर्वाह चालवणं कठीण आहे. तर काही जणांकडे लाखो कोटी रुपये आहेत. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारदरम्यान करण्यात आलेली जातिनिहाय जनगणना, मनरेगा आणि काँग्रेसकडून प्रस्थावित न्याय योजनेबाबतही भाष्य केलं.