Rahul Gandhi: ...तेव्हा प्रेम कुठं होतं? राहुल गांधींना पत्र लिहून भाजपा नेत्यांचा बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 07:42 PM2023-06-09T19:42:52+5:302023-06-09T19:43:24+5:30
Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये द्वेष पसवरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षानं प्रेमाचं दुकान सुरू केलं आहे, असा दावा केला होता. आता या मुद्द्यावरून भाजपाच्या तीन नेत्यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये द्वेष पसवरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षानं प्रेमाचं दुकान सुरू केलं आहे, असा दावा केला होता. आता या मुद्द्यावरून भाजपाच्या तीन नेत्यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यवर्धनसिंह राठोड, पूनम महाजन आणि प्रवेश वर्मा यांनी राहुल गांधी यांना नऊ पानांचं पत्र लिहून त्यांना आरसा दाखवला आहे. तसेच मनेका गांधी आणि चुलत भाऊ वरुण गांधी यांच्यासोबत केलेल्या वर्तनाचा उल्लेख करत भाजपा खासदारांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
भाजपा खासदारांनी आपल्या पत्रात लिहिलं की, राहुल गांधी जी, तुम्हाला कदाचित २८ मार्च १९८२ हा दिवस कदाचित आठवत असेल. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या आजी इंदिरा गांधी त्यांच्या धाकट्या सुनबाई मनेका गांधी यांच्यासोबत एवढ्या प्रेमाने वागल्या होत्या. की, त्यांना मध्यरात्री थेट घरातून बाहेर काढलं होतं. तेव्हा देशातील तमाम वृत्तपत्रांनी हा फोटो पहिल्या पानवर छापली होती. त्यात अश्रू ढाळत असलेल्या मनेका गांधी आणि त्यांच्यासोबत छोटा वरुण गांधी होता. जो त्या दिवशी तापानं फणफणत होता.
भाजपा खासदारांनी इथे खुशवंत सिंग यांचा उल्लेख केला. खुशवंत सिंग यांनी त्यांच्या ‘Truth, Love & a Little Malice’ मध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख केला होता. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मनेका गांधी जिथे जाणार असतील तिथे त्यांना सोडून या असे आदेश त्यांच्या ड्रायव्हरला दिले होते. एवढंच नाही तर वरुण गांधी यांच्या लग्नालाही राहु गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील कुणी गेलं नव्हतं, याची आठवणही भाजपा खासदारांनी पत्रामधून राहुल गांधी यांना करून दिली आहे. तुम्ही प्रेमाचं दुकान चालवल्याचं सांगता. मात्र प्रेमाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे, हे तुमच्या वैयक्तिक नात्यांमधून चांगल्या पद्धतीनं समोर येतं.
तुमचे बंधू वरुण गांधी हे लग्नाचं निमंत्रण घेऊन सोनिया गांधींच्या निवासस्थानी गेले होते. मात्र प्रेमाचं नातं निभावण्यासाठी तुम्ही, तुमची आई आणि बहीण वरुण गांधी यांच्या लग्नात सहभागी झाला नाहीत. मात्र वरुण गांधी सर्व अपमान विसरून प्रियंका गांधी यांच्या विवाहात सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या भाजपा खासदारांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींचाही उल्लेख करत त्याची आठवण राहुल गांधी यांना करून दिली. तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत काँग्रेसने केलेल्या वर्तनाचाही उल्लेख या पत्रात केला.