राहुल गांधी एक वर्ष अध्यक्षपदापासून राहणार दूर ? करणार 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:24 IST2019-06-19T11:06:39+5:302019-06-19T11:24:39+5:30
राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना केल्या.

राहुल गांधी एक वर्ष अध्यक्षपदापासून राहणार दूर ? करणार 'हे' काम
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी बोलविण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र पक्षाच्यावतीने राहुल यांचा राजीनामा एकमुखाने नाकारण्यात आला होता. त्यानंतरही राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले असून त्यांनी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे.
राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना केल्या. तसेच आपण पक्ष संघटनेचे काम करत राहणार असल्याचे म्हटले.
दरम्यान गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांना नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या दोन नेत्यांनी दक्षिण भारतातील नेत्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र कोणताही नेता राहुल असताना अध्यक्ष होण्यास तयार नाही. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील एखाद्या नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांच्या राजीनाम्यावर मधला मार्ग काढण्यात आला आहे. ज्यामुळे राहुल यांचा अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय कायम राहिल आणि पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल. न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी पदाशिवाय देशभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्ष संघटन मजबूत करतील. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी लवकरच काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.