राहुल गांधीच होणार काँग्रेसचे अध्यक्ष, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या दिग्गज नेत्याचे भाकित...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 07:11 PM2022-08-28T19:11:29+5:302022-08-28T19:11:35+5:30
राहुल गांधींनी 2019 मध्ये लाकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
नवी दिल्ली: रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही वेळातच पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश रावत म्हणाले की, राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, असे म्हटले आहे. खरगे म्हणाले, राहुल गांधींनी पुढे होऊन काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, असे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसह माझे वैयक्तिक मत आहे. तेच काँग्रेस पक्षाला संघटित करून मजबूत करू शकतात. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
22 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होईल
22 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर 8 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीत हे लोक सहभागी होते
वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात असलेल्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3.30 वाजता CWCची ऑनलाइन बैठक सुरू झाली. यावेळी सोनियांसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेराही उपस्थित होते. या बैठकीला आनंद शर्मा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री, के.सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक आणि पी. चिदंबरम यांच्याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते.