केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदे भरणार - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:29 AM2024-04-13T06:29:11+5:302024-04-13T06:29:51+5:30
राहुल गांधी; युवकांच्या ॲप्रेन्टिसशिपसाठी करणार कायदा
तिरुनेलवेली : सरकारी सेवेतील ३० लाख रिक्त पदे भरण्यासाठी तसेच युवकांना प्रशिक्षणार्थी (ॲप्रेन्टिसशिप) म्हणून काम मिळवून देण्याकरिता कायदा करू, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.
तामिळनाडूमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत सत्तेत आल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करणार आहोत. सरकारी सेवेमध्ये ३० लाख पदे रिक्त आहेत. युवकांना या पदांवर भरती करून घेण्याची मोहीम राबविण्यात येईल. सर्व पदवीधर, डिप्लोमाधारकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ठोस पावले उचलणार आहोत. त्यासाठी ‘प्रशिक्षणार्थी असण्याचा हक्क’ प्रदान करणारा कायदा संसदेत मंजूर केला जाईल.
देशात सध्या दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू
राहुल गांधी यांनी म्हटले की, पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव आहे. याआधी भारताकडे आदर्श लोकशाही राष्ट्र म्हणून सारे जग पाहात होते. मात्र, आता भारतामध्ये लोकशाहीला अर्थ उरलेला नाही, असे जगाचे मत बनले आहे.
आर्थिक स्रोत व माध्यमांसह सर्व गोष्टींवर आपली मक्तेदारी निर्माण करण्याचे मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. देशात सध्या दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू आहे. एका बाजूला सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समानता यांच्याविषयी आदर बाळगणारे लोक व दुसऱ्या बाजूस मोदी, रा. स्व. संघ यांची विचारसरणी असा हा लढा आहे.
मोदींकडून एक नेता, एक भाषा तत्त्वाचा पुरस्कार
nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, एक देश, एक नेता, एक भाषा या तत्त्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कार करतात.
nतामिळनाडूमध्ये पेरियर, सी. एन. अण्णादुराई, कामराज, एम. करुणानिधी अशी दिग्गज माणसे कार्यरत होती.
nसामाजिक न्यायाचे तत्व या राज्याने पाळले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.