राहुल गांधी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार, कुणा कुणाला भेटणार? असा आहे संपूर्ण कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 05:23 PM2024-08-31T17:23:25+5:302024-08-31T17:23:45+5:30
राहुल गांधी 8 सप्टेंबरला अमेरिकेतील डलास शहरात असतील. यानंतर 9 आणि 10 सप्टेंबरला ते वॉशिंग्टनमध्ये असतील...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढील आठवड्यात तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते भारतीय वंशाचे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, थिंक टँक आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी शनिवारी एक व्हिडिओ जारी करून यासंदर्भात माहिती दिली. राहुल गांधी 8 सप्टेंबरला अमेरिकेतील डलास शहरात असतील. यानंतर 9 आणि 10 सप्टेंबरला ते वॉशिंग्टनमध्ये असतील.
विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. सॅम पित्रोदा म्हणाले, "राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी, भारतीय वंशाचे नागरिक, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ, नेते, व्यापारी, आंतरराष्ट्रीय मीडिया माझ्याकडे आग्रह करत आहेत. हे लक्षात घेत ते अमेरिका दौऱ्यावर येत आहेत."
अमेरिकेत विद्यार्थ्यासोबत करणार चर्चा -
माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुल गांधी डलास येथील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधतील. ते स्थानिक भारतीय समुदाय आणि काही टेक्नोक्रॅट्सनाही भेटणार आहेत. ते डलास भागातील नेत्यांसोबत डिनरही घेतील. पित्रोदा म्हणाले, आम्ही दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन डीसीला पोहोचू, तेथे आम्ही विविध लोकांशी संवाद साधण्याची योजना आखत आहोत.
जम्मू-कश्मिरात दोन प्रचार सभा घेणार -
तत्पूर्वी, राहुल गांधी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. ते 4 सप्टेंबर रोजी अनंतनागमध्ये दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी ही माहिती दिली.