"राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील", केंद्रीय मंत्री सिंह का संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:38 PM2024-09-09T15:38:44+5:302024-09-09T15:39:36+5:30
राहुल गांधी यांना देशद्रोही म्हणत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हल्ला चढवला. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानाला उत्तर देताना गिरिराज सिंह देशद्रोही म्हणाले.
Rahul gandhi RSS : अमेरिका दौऱ्यात असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानाचे भारतात राजकीय पडसाद उमटताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे देशद्रोही म्हणून केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. टेक्सॉस शहरातील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
राहुल गांधींचे आरएसएसबद्दल विधान काय?
आरएसएसवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "भारत हाच एक विचार आहे, अशी आरएसएसची भूमिका आहे. पण आमची भूमिका अशी आहे की, भारत खूप साऱ्या विचारांनी बनलेला आहे. आमचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला स्वप्न बघण्याचे स्वातंत्र्य मिळावे. त्याचा धर्म-रंग न बघता त्याला संधी मिळावी."
गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींना काय दिले उत्तर?
राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानावर भूमिका मांडली. केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले, "त्यांच्या आजीला आरएसएसच्या भूमिकेबद्दल विचारण्याची कुठली सोय असेल, तर त्यांनी ते करायला हवे. नाहीतर इतिहासात डोकावून बघायला हवे."
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील. एक देशद्रोही आरएसएसला समजून घेऊ शकत नाही. जे लोक देशावर टीका करण्यासाठी परदेशात जातात, त्यांना आरएसएसचा विचार समजू शकत नाही", अशा शब्दात गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींना उत्तर दिले.
"मला असे वाटते की, राहुल गांधी फक्त भारताला बदनाम करण्यासाठी परदेशात जातात. ते या जन्मात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेऊ शकत नाही. कारण आरएसएस भारताच्या मूल्ये आणि संस्कृतीमध्ये आहे", असेही केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले.