राहुल गांधी अध्यक्ष होणार नाहीत; काॅंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:10 AM2022-08-21T06:10:07+5:302022-08-21T06:10:21+5:30
राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पुन्हा अध्यक्ष होण्यास साफ इन्कार केल्याने आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे.
आदेश रावल
नवी दिल्ली :
राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पुन्हा अध्यक्ष होण्यास साफ इन्कार केल्याने आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. पक्षात मागील वर्षापासून संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून आजवर काँग्रेसमध्ये असे काही सकारात्मक कार्य झालेले नसल्यामुळे राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होण्यास राजी नाहीत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वर्षाअखेर गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असून, तेथे काँग्रेससाठी फारशी आशादायक स्थिती नाही.
अलीकडेच पक्ष जेव्हा रस्त्यापासून ते संसदेपर्यंत महागाईच्या मुद्द्यावर निदर्शने करीत होता, तेव्हा दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांना पक्षाची सूत्रे सांभाळण्याची विनंती केली होती; परंतु त्यांनी उत्तर दिले नव्हते.
निकटवर्तीय नेत्यांनाही नकार कळवला
- राहुल गांधी यांनी निकटवर्तीय नेत्यांनाही अध्यक्ष होण्याबाबत नकार कळवला आहे.
- यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.