पाटण्यात राहुल गांधी दाखवणार काँग्रेसची ताकद, करणार रोड शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 06:10 AM2023-06-17T06:10:58+5:302023-06-17T06:11:29+5:30
विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर जाहीर सभा नाही; पण राेड शाे
हरिश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार येत्या २३ जून रोजी पाटणा येथे काँग्रेससह १६ विरोधी पक्षांची बैठक घेण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र बैठकीनंतर विरोधी पक्षांची जाहीर सभा होणार नाही. त्याच दिवशी काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांचा सहभाग असलेला भव्य रोड शो पाटणा येथे आयोजिण्याच्या हालचाली सुरू आहेत.
काँग्रेसच्या या दाेन नेत्यांचे पक्षाकडून पाटणा विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येईल. त्यानंतर विमानतळ ते बिहार काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयापर्यंत भव्य रोड शोचे आयोजन करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्याप्रसंगी या मार्गावर काँग्रेस सुमारे तीस भव्य स्वागत कमानी उभारणार आहे. रोड शोमध्ये बिहारमधील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनतेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल हे नेते अभिवादन करतील, अशी योजना आहे.
भाजपबरोबर जाण्यासाठी जीतनराम मांझी यांचा एचएएम हा पक्ष बिहार सरकारमधून बाहेर पडला. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट साधण्याच्या नितीशकुमार यांच्या प्रयत्नांना तडा गेला आहे.
लहान पक्षांवर लक्ष
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, जनता दल (युनायटेड) या पक्षांमध्ये फूट पाडणे शक्य नसल्याने भाजपने छोट्या पक्षांवर आपले लक्ष केंद्रित केले. छोट्या पक्षांनी साथ सोडली तर नितीशकुमार यांच्यासोबत काँग्रेस, जनता दल (युनायटेड), लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एमएल), माकप, भाकप हे सहा पक्षच उरण्याची शक्यता आहे.
इतर पक्षांना आपल्याकडे वळविण्याचे भाजपचे प्रयत्न
- बिहारमध्ये भाजप इतर पक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक जनता दल (आरएलजेडी) व मुकेश साहनी यांचा विकासशील इन्सान पक्ष (व्हीआयपी) भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.
- चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाशी (एलजेपी- रामविलास) देखील भाजपची चर्चा सुरू आहे. लोक जनशक्ती पक्षाचा पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट याआधीच भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील झाला आहे.