Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 10:52 AM2018-09-23T10:52:16+5:302018-09-23T10:54:53+5:30
टीका करताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा; जेटलींचा राहुल गांधींना सल्ला
नवी दिल्ली: राफेल विमान खरेदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आता अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीका करताना शब्दांचा वापर जपून करा, असा सल्ला जेटलींनी राहुल यांना दिला आहे. राफेल डीलवरुनराहुल गांधी सतत करत असलेल्या आरोपांमुळे मोदी सरकार मोठ्या अडचणीत आलं आहे. त्यातच फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानानं भाजपा सरकारच्या अडचणीत भर घातली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. काँग्रेसचे सर्व आरोप बिनबुडाचे असून राफेल करार रद्द होणार नाही, असं जेटलींनी यावेळी स्पष्ट केलं.
मोदी सरकारकडून राफेल करारासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आलं होतं. मोदी सरकारनं केवळ एकच नाव सुचवल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीकेची झोड उठवली. फ्रान्सचे माजी अध्यक्ष मोदींना चोर म्हणाले. आता तरी मोदींनी मौन सोडावं, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. राहुल यांनी केलेल्या टीकेचा अरुण जेटलींनी समाचार घेतला. 'सार्वजनिक सभा लाफ्टर चॅलेंज नसतात. कोणालाही जाऊन मिठी मारली, डोळा मारला, चुकीची विधानं केली, अशा गोष्टी करणं सोपं असतं. लोकशाहीत तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी शब्दांची निवड काळजीपूर्वक करायला हवी,' अशा शब्दांत जेटलींनी राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानाचा आणि राहुल गांधींनी 30 ऑगस्टला केलेल्या ट्विटचा संबंध असावा, असा संशयदेखील जेटलींनी व्यक्त केला. 'भ्रष्टाचाराचं जागतिकीकरण. दोन आठवड्यांमध्ये मोठे बॉम्ब पडणार आहेत. मोदीजी कृपया अनिल यांना सांगा, फ्रान्समध्ये मोठी अडचण झाली आहे,' असं ट्विट राहुल यांनी 30 ऑगस्टला केलं होतं. त्याचा संदर्भ देत हा संपूर्ण घटनाक्रम पद्धतशीरपणे तयार करण्यात आला असावा, अशी शक्यता जेटलींनी व्यक्त केली. 'पॅरिसमध्ये दोन आठवड्यानंतर मोठे बॉम्ब पडणार असल्याचं राहुल 30 ऑगस्टला म्हणतात आणि त्यानंतर फ्रान्सवा ओलांद काही विधानं करतात. हे सर्व जुळवून आणलं असावं,' असा संशय जेटलींनी व्यक्त केला.