राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आजपासून, १२ राज्यांतून निघणार ३५७० किमीची पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 07:05 AM2022-09-07T07:05:13+5:302022-09-07T07:05:20+5:30
दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत.
आदेश रावल -
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्यातून जाणार असून १५० दिवसांत ३५७० किमीचा प्रवास करून काश्मिरात पोहचणार आहे. ज्या राज्यात यात्रा पोहचणार नाही त्या राज्यांची माती आणि पाणी आणण्यात येणार आहे आणि यात्रेच्या मार्गात त्या मातीने, पाण्याने झाडे लावण्यात येणार आहेत.
दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मांडणार आहे. तसेच सामाजिक सद्भावाचा संदेश देणार आहे. या यात्रेसाठी पूर्ण देशातून ११७ लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. हे लोक पूर्ण यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत राहतील. याशिवाय ज्या राज्यातून ही यात्रा जाणार आहे तेथील १०० नेते आणि कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील. राहुल गांधी दररोज २५ किलोमीटर पायी चालणार आहेत.