मित्रांच्या हाती कृषी क्षेत्र देण्याची मोदींची इच्छा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; राहुल गांधींचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 01:51 AM2021-01-20T01:51:42+5:302021-01-20T07:09:08+5:30
राहुल गांधी यांनी देशाला इशारा दिला की, मोदी सरकारने ज्या प्रकारे अन्य क्षेत्रे चार पाच भांडवलदार मित्रांच्या हाती दिली आता फक्त कृषी क्षेत्र राहिले आहे. त्यातील एकाधिकारही मोदी समाप्त करू इच्छितात. त्याचा थेट परिणाम देशाच्या भविष्यावर पडणार आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार कृषी क्षेत्र त्यांच्या चार पाच मित्रांच्या हाती सोपवू इच्छितात. देशातील विमानतळे, ऊर्जा, दूरसंचार, रिटेल आदी क्षेत्रे आपल्या मित्रांच्या हाती तर त्यांनी आधीच सोपवली आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मोदी दुर्लक्ष करून दिशाभूल करीत आहेत, असे गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी देशाला इशारा दिला की, मोदी सरकारने ज्या प्रकारे अन्य क्षेत्रे चार पाच भांडवलदार मित्रांच्या हाती दिली आता फक्त कृषी क्षेत्र राहिले आहे. त्यातील एकाधिकारही मोदी समाप्त करू इच्छितात. त्याचा थेट परिणाम देशाच्या भविष्यावर पडणार आहे.
अर्णव गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप्प चॅट प्रकरणावर बोलताना गांधी यांनी मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, त्या चॅटमधून जो खुलासा झाला, बालाकोट हल्ल्याशी संबंधित घटना, जवान मारले जाण्याबद्दल ज्या गोष्टी समोर आल्या त्या अत्यंत गंभीर आहेत. ही गोपनीय माहिती गोस्वामी यांना कोणी दिली असा प्रश्नही त्यांनी विचारला. कदाचित पंतप्रधान मोदी किंवा हवाईदल प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांनी. कारण गोपनीय माहिती याच पाच जणांकडे होती. हे स्पष्ट आहे की यांच्यापैकीच कोणीतरी ती दिली. याची चौकशी व्हायला हवी. जर मोदी यांनी माहिती दिली असेल तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असे ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्या हस्ते "खेती का खून' या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. उल्लेखनीय आहे की, राहुल गांधी यांच्या या टीकेच्या आधी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करताना म्हटले होते की, चीनच्या मुद्यावर राहुल गांधी किती दिवस खोटे बोलणार आहेत?
देशातील सर्वोच्च संस्थांवर पंतप्रधानांचे नियंत्रण -
- राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला की, देशातील सर्वोच्च न्यायालय, प्रसारमाध्यमे किंवा संसद अशा सगळ्या संस्थांवर मोदी यांचे नियंत्रण आहे. “मी मोदींना भीत नाही, त्यांच्यापेक्षा जास्त कट्टरपंथी आहे, मला ते स्पर्शही करू शकत नाहीत. मात्र गोळी मारू शकतात” असे राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या
वेदनांबद्दल बोलताना म्हणाले.
- चीनच्या विस्तारवादी प्रवृत्तीबद्दल सरकारला इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही चीनचे ते धोरण समजून घेतले पाहिजे न की इव्हेंट मॅनेजमेंट. कारण चीन एक ठरवून रणनीतीने पुढे सरकत आहे. आमच्या सरकारला त्यातील गांभीर्य समजत नाही.