लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:29 PM2019-04-05T18:29:27+5:302019-04-05T18:31:26+5:30
भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
चंद्रपूर - भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना वाढत्या वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवाली ब्लॉग लिहून पक्षातील सध्याच्या घडामोडींविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. '' हिंदू धर्मात गुरुचे स्थान फार मोठे असते. मात्र नरेंद्र मोदींना आपल्या गुरुलाच डावलले आहे आणि आता ते आम्हाल हिंदू धर्म शिकवू पाहत आहेत.'' असे राहुल गांधी म्हणाले.
''मोदींच्या काळात लालकृष्ण अडवाणी यांना भाजपामध्ये अपमानित करण्यात आले. त्यांना जोडे मारून स्टेजवरून उतरवण्यात आले .'' असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, मोदींच्या आर्थिक धोरणांवरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींनी अदानीला ६ विमानतळ दिले. या मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदार केली आहे, असे घणाघाती आरोप करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसला निवडून देण्याचे व स्थिर सरकार आणण्याचे आवाहन येथील मतदारांना केले.
देशात पैशाची कमी नाही. जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी आणि मजुरांना देण्यासाठी पैशाची कमी आहे पण अंबानींसाठी ती कमी नाही. गरीबांना देत नसाल तर मग उद्योगपतींनाही पैसे देऊ नका. मेक इन इंडिया म्हटले पण देशात व्यापार ठप्प झाला आहे. सगळा चायना माल येथे येतो आहे. नोटबंदीला १२ वर्षांच्या मुलानेही नकार दिला असता. पण ती गोष्ट मोदींना कळली नाही. महागाई वाढते आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही निवडणुकांनंतर ट्रॅक्स प्रणाली सरळ करू. शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करू असे आश्वासन राहूल गांधी यांनी यावेळी दिले.