केंद्रातील सरकार लवकरच हटवणार, काश्मीरमध्ये राहुल गांधींचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:24 PM2024-09-05T13:24:21+5:302024-09-05T13:24:39+5:30
Jammu & Kashmir Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.
जम्मू - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने आपला आत्मविश्वास गमावला असून हे सरकार यापुढे सत्तेत राहणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. जम्मू-काश्मीरमधील बनिहाल विधानसभा मतदारसंघातील संगलदान येथे एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे कॉर्पोरेट मित्र चालवत असल्याचा दावा केला.
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी केंद्रशासित जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी दिले. “भाजपला आधी विधानसभा निवडणुका हव्या होत्या, भाजपची इच्छा असो की, नसो या प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल होईल, याची आम्ही खात्री करू, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
येथे एका राजाचे राज्य...
- येथे एका राजाचे राज्य आहे, ते म्हणजे नायब राज्यपाल. आधी केंद्रशासित प्रदेशाला राज्य बनवले जायचे, आता केंद्र सरकारने राज्याला केंद्रशासित करून टाकले, अशी टीकाही राहुल यांनी केली.
- तीन टप्प्यांत निवडणुका होत असलेल्या जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
...म्हणून काँग्रेससोबत
भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून आम्ही काँग्रेससोबत युती केली, असे मत नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. राहुल गांधी हे देशाचा आवाज आहेत. एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्याचे मी प्रथमच पाहत आहे,” असेही ते म्हणाले.