राहुल गांधींची न्याय यात्रा पुन्हा रोखली, गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडले बॅरिकेड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:23 AM2024-01-24T08:23:21+5:302024-01-24T08:23:59+5:30
गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी शहरातून जाणार होती. तथापि, प्रशासनाने परवानगी ...
गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी शहरातून जाणार होती. तथापि, प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे यात्रा शहराजवळ येताच पोलिसांनी ती अडवली. तेव्हा संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी बॅरिकेड्स तोडले.
मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी या घटनेला नक्षलवादी कृत्य संबोधत कार्यकर्त्यांना बॅरिकेड्स तोडण्यासाठी चिथावल्याबद्दल राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवले. मात्र, आम्ही कायदा मोडला नाही, असे राहुल म्हणाले. दुसरीकडे, मुख्यमंत्री सरमा यांनी या घटनेला नक्षलवादी कृत्य संबोधले.
यात्रा शहरात नको...
पोलिसांनी कामकाजाच्या दिवसाचे कारण देत राहुल यांच्या यात्रेला शहरात प्रवेशास नकार दिला होता. यात्रा शहरात आल्यास वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल, असे कारण सांगून पोलिसांनी यात्रा राष्ट्रीय महामार्गावरून नेण्याचे निर्देश दिले होते. यात्रा शहराजवळ आल्यानंतर पोलिसांनी ती रोखल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बॅरिकेड्स तोडले. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या चकमकीत अनेक जण जखमी झाले. आसाम सरकारच्या या कृत्याचा देशभरात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे.