डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:32 AM2024-08-19T09:32:17+5:302024-08-19T09:33:45+5:30

टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. 

Rahul Gandhi's 'Kathua to Kolkata' statement heats up politics, Congress-TMC face-to-face over kolkata doctor rape-murder case | डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

डॉक्टर बलात्कार-मर्डर प्रकरणावरून काँग्रेस-TMC आमने सामने, राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून राजकारण तापलं

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने जबरदस्त राजकारण पेटले आहे.  राहुल गांधी यांनी 'कठुआ ते कोलकाता' विधान करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर तीन दिवसांनंतर, आता तृणमूलनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. टीएमसीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधत, राहुल गांधी सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल केला आहे. 

I.N.D.I.A. ब्लॉकमधील बहुतांश पक्षांनी न्यायाची मागणी करत या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन केले आहे. मात्र याप्रकरणी राहुल गांधींनी यांनी टीएमसीवर निशाणा साधला आहे. "पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटे आहे.

कुणाल घोष यांचा राहुल गांधींवर पलटवार -
कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत यांनी कथित जमीन वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. हाच धागा पकडत, एका बातमीचा फोटो पोस्ट करत, तृणमूलचे माजी राज्यसभा खासदार कुणाल घोष यांनी एक्सवर लिहिले, 'तर, राहुल गांधी जी, आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणार का? हा भ्रष्टाचाराचा एक मोठा आरोप आहेत. पश्चिम बंगालमधील घटनेच्या खऱ्या माहितीशिवाय, ममता बॅनर्जी यांनी उचललेल्या पावलांची माहिती नसताना, आपण सोशल मीडियावर भाष्य केले आहे. आता, आपण आपल्या मुख्यमंत्र्यासंदर्भात पावले उचलण्याची कृपा कराला?" 

काय म्हणाले होते राहुल गांधी? -
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, "कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्याप्रकारे तिच्यासोबत क्रूर आणि अमानवी कृत्य घडले, त्यामुळे डॉक्टर आणि महिला वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर  प्रश्न निर्माण करतो." या घटनेने विचार करायला भाग पाडले आहे की, मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालकांनी कुठल्या भरवशावर आपल्या मुलींना बाहेर शिकायला पाठवायचे? निर्भया प्रकरणानंतर बनवलेले कडक कायदेही असे गुन्हे रोखण्यात अयशस्वी का आहेत?"

"हाथरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकात्यापर्यंत महिलांवरील वाढत्या घटनांवर प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक घटकाला एकत्रितपणे गांभीर्याने चर्चा करून ठोस उपाययोजना कराव्या लागतील. या असह्य दु:खात मी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे" असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. 
 

 

Web Title: Rahul Gandhi's 'Kathua to Kolkata' statement heats up politics, Congress-TMC face-to-face over kolkata doctor rape-murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.