मास्टरप्लॅन! राहुल गांधींनी सांगितला फॉर्म्युला; २०२४ ला भाजपाला हरवले जाऊ शकते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 03:13 PM2023-05-31T15:13:51+5:302023-05-31T15:14:30+5:30
कर्नाटकातील विजयाचा हवाला देत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला.
कॅलिफोर्निया - काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना भेटताना राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. आपल्या प्रदीर्घ भाषणात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत पीएम मोदींना टोला लगावला. कर्नाटकातील नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या विजयाचा अभिमान वाटत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. त्यासोबत २०२४ मध्ये भाजपाचा पराभव होऊ शकतो असंही त्यांनी दावा केला.
राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो. त्यासाठी भारतातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. काँग्रेस पक्ष देशातील सरकार बदलण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. विरोधकांनी एकत्र येत युती करून भाजपाला घेरण्याचे काम केले तर देशातील सत्ताधारी भाजपचा पराभव होऊ शकतो. मंगळवारी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सांताक्रूझच्या सिलिकॉन व्हॅली कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात मॉडरेटर आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना राहुल गांधींनी उत्तरं दिली. भाजपमधील कमकुवतपणा आणि उणिवा स्पष्टपणे दिसत आहेत, त्यामुळे भाजपा निवडणूक हरणार असून त्यांना सत्तेतून बाहेर काढू असं राहुल गांधींनी म्हटलं.
भाजपाला आमची यंत्रणा समजली नाही
कर्नाटकातील विजयाचा हवाला देत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष मोठ्या विजयासाठी बराच काळ काम करत होता आणि संपूर्ण निवडणुकीदरम्यान भाजपाला काँग्रेसची निवडणूक यंत्रणा समजू शकली नाही. म्हणूनच कर्नाटकात त्यांचा दारूण पराभव झाला आणि कर्नाटकच्या विजयाचे सार भारत जोडो यात्रेतून मिळाले. आमची भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा वापर करून आमच्या यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र जनतेची आम्हाला साथ मिळाली आणि ते काहीही करू शकले नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी भाजपावर केला.