राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:00 PM2022-12-09T15:00:56+5:302022-12-09T15:01:38+5:30
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपच्या या यशानंतर काँग्रेसच्या मानहानीकारण पराभवाचीची चर्चा रंगली आहे. त्यासोबतच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेलाही जोडलं जात आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये असून यात्रेतील घडामोडींची आणि राहुल गांधींच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या लूकवरुन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी हे सद्दाम हुसेनसारखे दिसायला लागलेत, असे विधान केले होते. यालाच धरुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी मी माझ्या कामाकडे लक्ष देतो, असे म्हटले.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती. मात्र, टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी एवढेच म्हणालो की जर तुम्हाला सद्दामसोबत बसवले तर तुम्हालाही तसेच वाटेल. पण तुम्ही दाढी काढलीत तर तुम्ही नेहरूंसारखे दिसाल, मात्र, त्यांच्या या तुलनात्मक विधानाची चर्चा सोशल मीडियासह माध्यमांतही दिसून आली. त्यावरुनच, आता आज तकच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींना हाच प्रश्न विचारण्यात आला. आपल्याच मुख्यमंत्र्यांनी अशी तुलना केली होती, आपणास काय वाटतं? त्यावर गडकरींनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
मी या वादविवादात पडू इच्छित नाही, मला वाटतं की ते विरोधी पक्षात आहेत. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सत्तारुढ पक्षाची जेवढी गरज आहे, तेवढीच विरोधी पक्षाच्या मजबुतीचीही आवश्यकता आहे. मी कालच युट्यूबवर अटलबिहारी वाजपेयी याचं भाषण ऐकत होतो. त्यामध्ये, अटलबिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरुंची तुलना जगातील दोन अशा नेत्यांसोबत केली होती, त्यावरुन संसदेत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, हा वाद झाल्यानंतरही रात्री जेव्हा नेहरुजी मला भेटले, तेव्हा त्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं. म्हणजे, टीका करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असतो, राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षात आहेत, त्यांचा पक्ष विपक्ष आहे. त्यामुळे, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम करायला हवं, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले. तसेच, प्रत्येकाला मेहनत करण्याचा अधिकार आहे, जेवढी ताकद आहे, तेवढी पणाला लावू द्यात. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, जो सरस ठरेल तो पुढे जाईल, असेही भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना गडकरींनी म्हटले.