राहुल गांधी यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:10 AM2019-04-05T08:10:10+5:302019-04-05T08:11:03+5:30
वायनाडमधून भरला अर्ज : भावाला सहकार्य करा : प्रियांका
कलपेट्टा : केरळमधील वायनाड मतदारसंघातूनलोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथे गुरुवारी केलेल्या रोडशोला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला हेही होते. या रोडशोमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. राहुल व प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी हस्तांदोलन केले.
राहुल व प्रियांका यांची छबी लोक मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना दिसत होते. या रोड शोमध्ये काँग्रेस व इंडियन युनियन मुस्लीम लीग या दोन्ही पक्षांचे झेंडे फडकताना दिसत होते. राहुल गांधी यांनी जिथे उमेदवारी अर्ज दाखल केल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे दक्षिण भारतातील संस्कृती, भाषा, इतिहास यांना धोका निर्माण झाल्याची भावना जनतेमध्ये आहे. देशभरातीर जनतेला आश्वस्त करण्यासाठीच मी उत्तर व दक्षिण भारतातून एकाचवेळी निवडणूक लढवत आहे. राहुल गांधी हे अतिशय निर्भय आहेत, वायनाडच्या जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी नंतर ट्विटरवरून केले. प्रियांका यांनी म्हटले आहे की, माझा भाऊ हा माझा विश्वासू मित्रही आहे. ते वायनाडमधील मतदारांचा अपेक्षाभंग करणार नाहीत.
डाव्यांवर टीका नाही
वायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे डावे पक्ष संतापले असून, त्यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. त्याबाबत विचारता राहुल म्हणाले की, त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला वा टीका केली तरी आपण मात्र डाव्या पक्षांवर अजिबात टीका करणार नाही.
जनतेचा अवमान - इराणी : राहुल गांधी यांनी वायनाडमधून अर्ज दाखल करून अमेठीच्या जनतेचा अवमान केला आहे अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. अमेठीमधून त्या भाजपतर्फे रिंगणात आहेत.