राजघाटावर राहुल गांधी यांचा आज सत्याग्रह; राज्यांत शांततापूर्ण आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:30 AM2023-03-26T06:30:39+5:302023-03-26T06:40:00+5:30
राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला.
- आदेश रावल
नवी दिल्ली: लोकसभेचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस रविवारी दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह करणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सत्याग्रह चालेल. याचबरोबर संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही सर्व प्रदेशाध्यक्षांनाही दिल्लीतून कार्यक्रम तयार करून पाठवला आहे. सर्व राजधान्यांमध्येही दिल्लीच्या धर्तीवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तथापि, काँग्रेस मालिकाबद्ध रीतीने कार्यक्रम तयार करीत आहे.
शनिवारी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीजवळ रविवारी काँग्रेस दिवसभर संकल्प सत्याग्रह करणार आहे. राहुल गांधी यांनी बडे उद्योगपती गौतम अदानी यांचा भ्रष्टाचार सातत्याने उघडकीस आणला असल्याने राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात आहे, हेच यातून दाखवायचे आहे.