राहुल गांधींना किती कळतं?; अरुण जेटलींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 09:21 PM2018-06-06T21:21:41+5:302018-06-06T21:21:41+5:30
राहुल गांधींच्या टीकेचा अरुण जेटलींकडून मुद्देसूद समाचार
नवी दिल्ली: मोदी सरकारवर तोफ डागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अर्थमंत्री अरुण जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'राहुल गांधींना किती कळतं? त्यांना कधी समज येणार आहे? मध्य प्रदेशातील त्यांचं आजचं भाषण ऐकून माझ्या मनात हेच प्रश्न आले,' असं जेटलींनी फेसबुकवर लिहिलं आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राहुल यांनी मंदसौरमध्ये जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतरच्या सभेत त्यांनी मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. या हल्ल्याला आता जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अरुण जेटलींनी फेसबुकवर ब्लॉग लिहून राहुल गांधींच्या सर्व मुद्यांचा समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा, उद्योगपतींचं माफ करण्यात आलेलं कर्ज, बेरोजगारी या मुद्यांवरुन राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेचा जेटलींनी मुद्देसूद प्रत्युत्तर दिलं आहे. 'सरकारनं उद्योगपतींचं एकाही रुपयाचं कर्ज माफ केलेलं नाही. राहुल गांधी चुकीची माहिती देत आहेत. बँकांची देणी थकवणाऱ्या उद्योगपतींना दिवाळखोर घोषित करण्यात आलं असून त्यांची कंपन्यांमधून हकालपट्टी करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. या उद्योगपतींना यूपीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप झालं होतं,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
बुडित खात्यात गेलेल्या बँकांच्या कर्जावरुन राहुल गांधींनी केलेल्या टीकेलाही जेटलींनी उत्तर दिलं. 'बुडित खात्यात गेलेल्या कर्जाला यूपीए दोन सरकारचा कारभार जबाबदार आहे. सध्या मोदी सरकार कर्जाची वसुली करण्यास प्राधान्य देत आहे,' असं जेटलींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. देशात मोबाईल निर्मिती केंद्रांची संख्या कमी असल्याच्या राहुल यांच्या टीकेलाही जेटलींनी प्रत्युत्तर दिला. '2014 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेतून बाहेर गेलं, त्यावेळी देशात फक्त दोन मोबाईल निर्मिती केंद्रं होती. सध्याच्या घडीला देशात तब्बल 120 मोबाईल निर्मिती केंद्रं आहेत. यासाठी तब्बल 1 लाख 32 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे,' अशी आकडेवारी त्यांनी दिली.