Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:36 AM2018-11-12T10:36:31+5:302018-11-12T10:41:55+5:30
राजस्थानच्या राजकारणातला अजब मतदारसंघ पुन्हा चर्चेत
जयपूर: निवडणूक म्हटली की प्रत्येक मतदारसंघ जिंकण्यासाठी राजकीय पक्ष ताकद लावतात. मात्र राजस्थानात असाही एक मतदारसंघ आहे, जो गमावला तर भाजपा, काँग्रेसला आनंदच होईल. कोटा जिल्ह्यातील हिंडोली विधानसभा मतदारसंघ आणि राज्यातील राजकीय स्थिती मोठी अजब आहे. 'हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं' हा बाजीगर चित्रपटातील डायलॉग इथे अगदी परफेक्ट लागू होतो.
जो पक्ष हिंडोली विधानसभा मतदारसंघ जिंकतो, त्या पक्षाला राज्यात सरकार स्थापन होत नाही, असं इतिहास सांगतो. त्यामुळे राज्यभरात विजयासाठी ताकद पणाला लावणारे राजकीय पक्ष हिंडोली जिंकण्यासाठी मात्र फारसा जोर लावत नाही. उलट हिंडोलीत आपला पराभव व्हावा, अशीच भाजपा, काँग्रेसची इच्छा असते. गेल्या 28 वर्षांचा इतिहास लक्षात घेतल्यास हा योगायोग दिसून येतो. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2013 मध्ये काँग्रेसचे अशोक चांदना हिंडोली मतदारसंघातून विजयी झाले. मात्र काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. 200 जागा असलेल्या राजस्थानात काँग्रेसला 25 जागादेखील मिळाल्या नाहीत.
1990, 1993 आणि 2003 मध्ये हिंडोलीत काँग्रेसचा झेंडा फडकला. मात्र राज्यात कमळ फुललं आणि भाजपाला सत्ता मिळाली. 2008 मध्ये या मतदारसंघात कमळ उमललं. मात्र राज्यातील जनतेनं काँग्रेसला हात दिला. त्यामुळे भाजपाला सत्ता सोडावी लागली. 1998 मध्ये मात्र हा योगायोग पाहायला मिळाला नाही. त्यावेळी हिंडोलीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला आणि राज्यातही काँग्रेसलाच सत्ता मिळाली. मात्र काही महिन्यातच इथे पोटनिवडणूक झाली आणि भाजपानं सरशी साधली. मात्र राज्यातील काँग्रेसची सत्ता कायम राहिली. त्यामुळे यावेळी हिंडोलीतील जनता कोणाला साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.