Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या बंडावर राहुल गांधींचं अप्रत्यक्ष भाष्य; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 06:50 PM2020-07-15T18:50:55+5:302020-07-15T19:09:31+5:30
Rajasthan Political Crisis: पायलट यांचा उल्लेख न करता राहुल गांधींचं सध्याच्या घडामोडींवर भाष्य
नवी दिल्ली: काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडामुळे राजस्थानात काँग्रेसच्या अडचणी (Rajasthan Political Crisis) वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत पायलट यांनी त्यांना थेट बहुमत सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान दिलं. मात्र आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान देऊन सरकारला धोका पोहोचवल्याप्रकरणी काँग्रेसनं काल सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षापदावरून दूर करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींवर राहुल यांनी आज एनएसयूआयच्या बैठकीत अप्रत्यक्ष भाष्य केलं. 'कोणालाही पक्ष सोडायचा असल्यास ते तसं करू शकतात. त्यामुळे तुमच्यासारख्या नेत्यांना संधी मिळते,' असं राहुल गांधींनी एनएसयूआयच्या बैठकीत म्हटल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.
If anybody wants to leave the party they will. It opens the door for young leaders like you, said Rahul Gandhi at an NSUI meeting today: Sources (file pic) pic.twitter.com/jxG0NTgNlO
— ANI (@ANI) July 15, 2020
बंडखोर आमदारांना नोटीस
राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू असताना काँग्रेसनं बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची तयारी पक्षानं केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. यामध्ये पायलट यांच्यासह १९ आमदारांचा समावेश आहे.
गांधी कुटुंबाशी असलेले संबंध बिघडवण्याचे प्रयत्न
उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी अद्याप पत्रकार परिषद घेतलेली नाही. आपण आजही काँग्रेसी आहोत आणि भाजपामध्ये जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केवळ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी केल्या जात असल्याचं पायलट यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. राजस्थानमधील काही स्वपक्षीय नेते माझे पक्ष नेतृत्त्वासोबतचे संबंध बिघडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.