सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:06 PM2020-08-10T16:06:48+5:302020-08-10T16:20:11+5:30
पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
जयपूर - राजस्थानमध्ये पुन्हा राजकीय घडामोडी घडणार आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांसोबत घरवापसी करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक झाल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी 12.30 च्या सुमारास सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 14 ऑगस्टपासून राजस्थानात विधानसभा सत्र सुरू होणार असून त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी सत्रात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.
याआधी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले होते की, राहुल गांधी अद्यापही सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये घेण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे, अशोक गेहलोत यांनी रविवारी आमदारांना आत्तापर्यंत दाखवल्याप्रमाणे विधानसभेत एकजुटता दाखवण्यास सांगितले आहे.
जैसलमेरच्या रिसॉर्टमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि पाठिंबा देणार्या पक्षांच्या बैठकीत संबोधित करताना अशोक गहलोत म्हणाले, आम्ही सर्व लोकशाहीचे योद्धा आहोत. आम्ही ही लढाई जिंकणार आहोत आणि साडेतीन वर्षानंतरही निवडणुका जिंकू."
याचबरोबर, अशोक गहलोत यांनी सर्व आमदारांना तयारीसह सभागृहात जाण्यास सांगितले व नंतर त्यांच्या संबंधित मतदार संघात जाऊन लोककल्याणकारी कामांची यादी सादर करावी जेणेकरून सरकार त्यावर काम करू शकेल. तसेच, राजकीय घडामोडी आणि राज्यातील कोरोना विषाणू संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्याचा विश्वास अशोक गहलोत यांनी व्यक्त केला.