Rajasthan Political Crisis: ...तर आम्ही पुन्हा पक्षात येऊ; सचिन पायलट यांच्या समर्थकांनी केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 01:33 PM2020-07-14T13:33:38+5:302020-07-14T13:34:32+5:30
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सचिन पायलट सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिल्याचे दिसून आले.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. त्यामुळे यावर काही मार्ग काढण्यासाठी आज सकाळी बैठक बोलवण्यात आली होती. सचिन पायटल आणि त्यांच्या समर्थकांना देखील या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सचिन पायलट सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी आता सचिन पायलट यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Rajasthan Political Crisis)
सचिन पायलट यांच्या गटाकडून अशोक गहलोत यांचे नेतृत्व बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. अशोक गहलोत यांचे नेतृत्व बदलल्याशिवाय आम्ही परत काँग्रेस पक्षात येणार नाही, अशी ठाम भूमिका सचिन पायलट समर्थक आमदार भंवरलाल शर्मा यांनी स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे २२ आमदारांचे संख्याबळ असून अशोक गहलोत यांच्याकडे बहुमत नसल्याचा दावा देखील भंवरलाल शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष देखील आता सक्रिय झाला आहे. या संदर्भात मंथन करण्याची घोषणा भाजपने राजस्थानात केली आहे.भाजपाच्या या बैठकीत सतीश पूनिया, गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, चंद्रशेखरसह अन्य प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीसोबतच भाजपा पहिल्यांदाच राजस्थानच्या राजकीय संघर्षात उतरल्याचं दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील राज्य नेतृत्व केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात राहून प्रत्येक हालचालींबाबत त्यांना माहिती देत आहेत. (Rajasthan Political Crisis)
भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासून सांगतोय हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आहे. आम्हाला जेव्हा वाटेल आमच्या भूमिकेची गरज आहे, त्यावेळी आम्ही एकत्र बसून चर्चा करु, सध्या राज्यात जे सुरु आहे त्याबाबत भाजपा (BJP) नेत्यांमध्ये बैठक होईल, त्यामध्ये पुढील विचार आणि भूमिका ठरवली जाईल. तसेच जर काँग्रेसला वाटत असेल भाजपा त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांनी याची चौकशी करावी, कोणतंही तथ्य नसताना उगाच राजकीय फायद्यासाठी विधानं करु नये असं त्यांनी काँग्रेसला (Congress) बजावलं आहे.