Ramdas Athawale : "राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, काँग्रेसच दहशतवादी"; रामदास आठवलेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:13 PM2024-07-02T13:13:48+5:302024-07-02T13:21:31+5:30
Ramdas Athawale And Congress Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आता भाष्य केलं आहे. "राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, काँग्रेसच दहशतवादी" असा गंभीर आरोप केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपावर देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करत भाजपाचे हे लोक हिंदू नाहीत असं विधान केलं. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या मुद्द्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आता भाष्य केलं आहे. "राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, काँग्रेसच दहशतवादी" असा गंभीर आरोप केला आहे. "राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटलं, ते स्वतः दहशतवादी आहेत, काँग्रेसच दहशतवादी आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणं चुकीचं आहे. राहुल गांधी हिंदू समाजाला तोडण्याचं काम करत आहेत, हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही; परंतु भाजपने युवक, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केली; परंतु अल्पसंख्याक या देशाच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे आहेत. हा अहिंसेचा देश आहे, भीतीचा नाही. भगवान शिव म्हणतात- घाबरू नका, घाबरवू नका. ते अहिंसेबद्दल बोलतात. जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा आणि द्वेषावर बोलतात. तुम्ही (भाजप) हिंदू असूच शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांच्या दाव्यांचे खंडन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनदा त्यांच्या जागेवरून उठले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” अग्निवीरांच्या मृत्यूनंतर त्यांना शहीद दर्जा मिळत नाही, असा आरोपही गांधी यांनी केला. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निवीराच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद असल्याचे निदर्शनास आणून दिले.