काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 05:28 PM2019-06-09T17:28:08+5:302019-06-09T17:34:18+5:30
राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे, असही प्रसाद म्हणाले.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी सुधारले नसल्याची टीका प्रसाद यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तरी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सुधारणा झाली नसल्याचे प्रसाद म्हणाले. राहुल सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोदींवर निशाना साधला. मी कठोर शब्दांचा वापर करतो, परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी राग आणि द्वेष निर्माण करून देशातील नागरिकांना विभागण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राहुल यांनी म्हटले होते.
काँग्रेस पक्ष म्हणजे बंधुभाव आणि सत्याचं रूप आहे. मात्र नरेंद्र मोदी खोटं आणि द्वेषाच्या जोरावर देशावर राज्य करत आहेत. भाजपच्या खोटेपणाविरुद्ध काँग्रेसची लढाई सुरूच राहिल, असंही राहुल म्हणाले. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच पराभवानंतर तरी सुधारणा करा, असा टोला लगावला. तसेच राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे. जनतेला मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी राममंदिरा संदर्भातील शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले.