राहुल गांधी यांच्या स्वबळाच्या वक्तव्याने प्रादेशिक पक्ष नाराज; शिवसेनेसह अनेकांमध्ये चलबिचल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:05 AM2022-05-17T06:05:20+5:302022-05-17T06:05:56+5:30
प्रादेशिक पक्षांकडे कोणतीही ठोस विचारसरणी तसेच व्यापक भूमिका नाही. त्यामुळे भाजपविरोधात फक्त काँग्रेसच स्वबळावर लढा देऊ शकते, असे राहुल गांधी यांनी म्हणाले होते.
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रादेशिक पक्षांकडे कोणतीही ठोस विचारसरणी तसेच व्यापक भूमिका नाही. त्यामुळे भाजपविरोधात फक्त काँग्रेसच स्वबळावर लढा देऊ शकते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले शिवसेना, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा (झामुम), राजद आदी प्रादेशिक पक्ष नाराज झाले आहेत.
काही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी केलेल्या प्रादेशिक पक्षांना राहुल गांधी यांचे विधान झोंबले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेबरोबर काँग्रेसही सहभागी आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष महाराष्ट्रातच एकत्रितपणेच निवडणुका लढतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच सांगतात; पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मात्र काही वेगळेच विधान केले आहे याकडे राजकीय निरीक्षकांनी लक्ष वेधले. राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांबाबत रविवारी काढलेल्या उद्गारांबाबत शिवसेनेच्या एकाही नेत्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
राहुल गांधी यांच्या उद्गारांविरोधात राष्ट्रीय जनता दलाने नाराजी व्यक्त केली आहे. लालुप्रसाद यादव यांनी २० वर्षांपूर्वी काँग्रेसबरोबर युती केली होती व भाजपविरोधात सातत्याने लढा दिला. झारखंडमध्ये काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाशी आघाडी केली. तसेच हे दोन्ही पक्ष सध्या तेथील आघाडी सरकारमध्ये सामील आहेत. झामुमच्या एका नेत्याने सांगितले की, भाजपला पराभूत करण्यात काँग्रेस अपयशी ठरत होती. त्यावेळी आमच्या पक्षाने भाजपला झारखंडमध्ये पराभूत केले. असे असतानाही प्रादेशिक पक्षांना ठोस विचारसरणीच नाही, असे राहुल गांधी कसे काय म्हणू शकतात?
केरळमधील पक्षांचीही नापसंती
केरळमधील काही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेसने युती करून युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटची स्थापना केली आहे. या मित्रपक्षांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत नापसंती व्यक्त केली. तामिळनाडूमध्ये द्रमुक व काँग्रेसची आघाडी आहे. त्या दोन पक्षांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकाही एकत्र येऊन लढल्या आहेत.