"रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:45 IST2025-03-12T12:44:33+5:302025-03-12T12:45:38+5:30
Sambit Patra News: भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला.

"रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस...
भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केलेल्या टीकेचा आधार घेत संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले होते. रोहित शर्मा नाही तर राहुल गांधी अनफिट आहेत, असं विधान संबित पात्रा यांनी केलं. त्यावरून काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. अखेरीस लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाची मर्यादा राखण्याचं आवाहन दोन्ही पक्षांना केलं. त्यानंतर संबित पात्रा यांनी आपलं विधान मागे घेतलं.
लोकसभेत काल मणिपूरच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू असताना भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य करत एक टिप्पणी केली. संबित पात्रा म्हणाले की, या काँग्रेस पक्षाने सांगितलं की, रोहित शर्मा अनफिट आहे. खरंतर रोहित शर्मा अनफिट नाही आहे तर राहुल गांधी अनफिट आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत जगाच्या विजेतेपदाचा चषक पटकावेल.
संबित पात्रा यांच्या या विधानावरून लोकसभेमध्ये जोरदार राडा झाला. काँग्रेसच्या खासदारांनी संबित पात्रा यांच्या वक्तव्याला विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा तालिका अध्यक्ष असलेल्या संध्या राय यांनी हे वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून हटवण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध कायम ठेवला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सदस्यांना सांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकले नाहीत. त्यामुळा काही वेळासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यावर संबित पात्रा यांनी जर माझ्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते किंवा इतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझं वाक्तव्य मागे घेण्यास तयार आहे, असे सांगितले.