भीमा - कोरेगाव हिंसेमागे RSS चा हात, लोकसभेत काँग्रेस आक्रमक; नरेंद्र मोदींनी निवेदन देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 12:57 PM2018-01-03T12:57:59+5:302018-01-03T13:36:53+5:30
काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी भीमा - कोरेगाव हिंसेमागे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला आहे
नवी दिल्ली - भीमा - कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना लोकसभेतही या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी भीमा - कोरेगाव हिंसेमागे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला आहे. सोबतच जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे दलितांवर अत्याचार होतात असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर लोकसभेत निवेदन देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी 'मौनी बाबा' असल्याचा टोलाही लगावला.
काँग्रेसने केलेल्या आरोपावर बोलताना भाजपाने काँग्रेस समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ब्रिटिशांनंतर काँग्रेस तोडा आणि राज्य करा निती अवलंबत आहे. काँग्रेस परिस्थिती भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. आग विझवण्याऐवजी ती भडकावण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत असा आरोप भाजपाने केला.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावेळी गोंधळ करणा-या खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर राजकारण करु नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दलितांचं भलंही नको, आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही असं सुमित्रा महाजन यांनी यावेळी सुनावलंस
शिवाजीराव अढळराव पाटील यांनी या प्रकरणावर निवेदन देताना काही लोकांनी राजकारण करण्यासाठी, जातीय तेढ वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे असा आरोप केला. पोलीस परिस्थिती हाताळू शकत नसल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला मदत पाठवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
भाजपा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काँग्रेसवर आरोप करताना तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.