RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 03:03 PM2018-08-27T15:03:34+5:302018-08-27T15:20:35+5:30
कार्यक्रमासाठी आरएसएस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं दिसत आहे. राहुल गांधींकडून आरएसएसवर वारंवार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. एकीकडे राहुल गांधी आरएसएसवर जहरी टीका करत असताना दुसरीकडे राहुल गांधींना आरएसएसकडून कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आरएसएसनं पुढील महिन्यात 'भविष्य का भारत' कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आरएसएसचा हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. 'भविष्य का भारत' या कार्यक्रमासाठी राहुल गांधी व येचुरी यांच्यासहीत अन्य राजकीय नेत्यांनाही RSS निमंत्रण पाठवणार आहे.
दरम्यान, राहुल गांधींकडून वारंवार आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीवर आक्रमकरित्या निशाणा साधण्यात येतो. आरएसएस देशाची विभागणी करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यापूर्वी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरसंघचालक मोहन भागवत 'भविष्य का भारत- आरएसएस का दृष्टिकोण' या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
कार्यक्रमाबाबत बोलताना RSS प्रचारक अरुण कुमार यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनाही यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. यावेळेस राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, 'संपूर्ण जग मुस्लिम दहशतवाद, मुस्लिम ब्रदरहुडपासून किती पीडित आहे. हे जर ते जाणत असते तर त्यांनी असे विधान केले नसते. जे आतापर्यंत भारताला समजू शकलेले नाहीत त्यांना संघ काय समजणार?', अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल चढवला आहे.