रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 05:08 PM2018-02-13T17:08:41+5:302018-02-13T17:09:34+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे.
बंगळुरु - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आरएसएस चालवत आहे, प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आज केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असेल. चार दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्याचा शेवटचा दिवस होता. कर्नाटक येथील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी आज बिजनेस लीडर्स आणि प्रोफेशनल्ससोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संघ आणि भाजपा सरकारवर टिका केली. ते म्हणाले की, सध्या मोदी सरकार संघ चालवत आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात त्यांचे लोक आहेत. सचिव पदाची नियुक्तीही आरएसएसचे करतेय.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, निती आयोगामध्येही आरएसएसचे लोक आहेत. भाजपाचा भारतातील प्रत्येक इंस्टीट्यूशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे. भारताची विदेश नितीही त्यामुळंच खराब होत आहे. चीन आपल्या शेजारील सर्व देशांवर आपला धाक जमवून बसला आहे आणि भारत एकटाच पडला आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी कमी करु असे अश्वासन दिले. ते म्हणाले की, 2019 मध्ये जर आम्ही सत्तेत आलो तर या किचकट आणि कठीण जीएसटीमधून मुक्ताता करु. तसेच टॅक्स स्लॅब आणखी कमी करु. यावेळी त्यांनी नोटाबंदीही आरबीआयची नसून आरएसएसची असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका
भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात केली.
कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.