Russia vs Ukraine War: भारत सरकार काहीच करत नाही; राहुल गांधींनी मांडली युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 09:26 PM2022-02-28T21:26:23+5:302022-02-28T21:26:42+5:30
Russia vs Ukraine War: राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडीओ ट्विट
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचा पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रविवारी यासंदर्भात मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना बंकरमध्ये दिवस काढावे लागले आहेत. युक्रेन सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. याकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लक्ष वेधलं आहे.
राहुल गांधींनी युक्रेनमधील अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची अवस्था बिकट होत चालली आहे. भारत सरकार त्यांच्या घरवापसीसाठी प्रभावी पावलं उचलत नाहीए,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील तरुणी युक्रेनमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे.
दुतावासातील अधिकारी फोन उचलत नाहीत. अनेकदा कॉल करूनही त्यांच्याकडून उत्तर मिळत नाही, अशी व्यथा व्हिडीओमधील विद्यार्थिनी मांडत आहे. 'इतर देशांनी त्यांच्या नागरिकांची युक्रेनमधून सुटका केली. पण भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. रोमानियाची सीमा इथून ८०० किलोमीटरवर आहे. आम्ही तिथपर्यंत कसं जायचं?,' असा सवाल विद्यार्थिनीनं उपस्थित केला आहे.
Conditions of Indians stranded in Ukraine are worsening.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 28, 2022
Yet, GOI is not taking effective steps to bring them home.
As usual, PM is MIA. pic.twitter.com/n8MfPAgxvD
याआधी राहुल गांधींनी भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली होती. राहुल गांधींनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलंय की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ,फोटो येत आहेत ते पाहून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकते. असे व्हिडीओ पाहून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असतील. कुठल्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही