S Jaishankar Rahul Gandhi: 'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:35 PM2023-02-21T17:35:10+5:302023-02-21T17:35:19+5:30
India-China Boarder Dispute: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.
S Jaishankar On Rahul Gandhi: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. भारत-चीन तणावाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी एएनआय या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ते(राहुल गांधी) भारत सरकार घाबरले आहे, असा चुकीचा समज पसरवत आहेत. भारतीय सैन्याला LAC वर कोणी पाठवले? राहुल गांधींनी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, मला वाटते की ते जाणीवपूर्वक परिस्थितीचे चुकीचे वर्णन करत आहेत. सीमेवरील पायाभूत सुविधांबाबत हे सरकार गंभीर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर चीनबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार चीनचे नाव घ्यायला घाबरते, असे राहुलचे म्हणणे आहे. यावर एस जयशंकर यांनी जाहिररित्या चीनचे नाव घेऊन त्यांना उत्तर दिले.
ते पुढे म्हणतात, मी सर्वाधिक काळ चीनचा राजदूत होतो आणि सीमाप्रश्न हाताळत होतो. मी असे म्हणणार नाही की मला सर्वात जास्त ज्ञान आहे, परंतु मी असे म्हणेन की मला या (चीन) विषयावर बरेच काही माहित आहे. जर त्यांना (राहुल गांधी) चीनबद्दल माहिती असेल तर मी त्यांच्याकडून शिकण्यास तयार आहे. जी विचारधारा आणि राजकीय पक्ष भारताबाहेर आहेत, तत्सम विचारधारा आणि पक्ष भारतातही आहेत आणि दोघेही एकत्र काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये झालेल्या चकमकीबाबत राहुल गांधी यांनी अलीकडेच चीन युद्धाच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. मोदी सरकार याबाबत गंभीर नाही. त्यामुळे सरकार आमच्या प्रश्नांची उत्तरेही देत नाही. केंद्र सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा दावा त्यांनी केला होता.