राहुल गांधी म्हणाले, "सद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफीदेखील निवडणुका जिंकत होते"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:28 AM2021-03-17T08:28:42+5:302021-03-17T08:31:27+5:30
Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वीडनच्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत भारत लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचा केला होता आरोप
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वीडनच्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत भारत लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचा आरोप केला होता. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला होता. दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसंच इराकचे हुकुमशाह सद्दाम हुसैन आणि लिबियाचे मुअम्मर गद्दाफीहेदेखील निवडणुका जिंकत होते, असं वक्तव्य केलं.
"सद्दाम हुसैन आणि गद्दाफी यांच्या शासन काळातही निवडणुका होत होत्या. तेदेखील निवडणुका जिंकत होते. असं नव्हतं की लोकं त्यांना मतं देत नव्हती. परंतु त्यांच्या मतांच्या सुरक्षेसाठी कोणतीही संस्थात्मक चौकट नव्हती," असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आशुतो। वार्ष्णेय. अन्य सदस्य आणि विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
"निवडणुका केवळ अशा नाहीत की लोकांनी जाऊन बटन दाबून आपल्याला मताच्या मिळालेल्या अधिकाराचा वापर करावा. निवडणूक ही एक संकल्पना आहे. निवडणूक ही एक संस्था आहे जी देशाची चौकट योग्यरित्या काम करत आहे किंवा नाही हे ठरवत असते. निवडणूक ती आहे की न्यायपालिका निष्पक्ष असाववी, संसदेत चर्चा व्हावी आणि कोणत्याही मतांच्या गणनेसाठी या आवश्यक बाबी आहेत," असंही ते म्हणाले. राहुल गांधींचं हे वक्तव्य अशावेळी आलं आहे, जेव्हा त्यांनी स्वीडनच्या एका संस्थेच्या अहवालाचा हवाला देत भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नसल्याचं वक्तव्य केलं होतं.
आणीबाणी चुकीची
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी प्रोफेसर कौशिक बसू यांच्यासोबत संवाद साधला होता. चर्चेदरम्यान त्यांनी देशात इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चुकीची होती असं म्हणत आता देशात त्याच्यापेक्षाही वाईट काळ सुरू असल्याचं म्हटलं होतं. देशातील संस्थांमध्ये एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांच्या प्रवेशाला बळकटी दिली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.