यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:06 AM2024-04-29T03:06:45+5:302024-04-29T03:08:39+5:30
गांधी यांनी रविवारी सरसंघचालकांनी यापूर्वी आरक्षणाला विरोध दर्शविला होता, असा दावा केला.
दमण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सरसंघचालकांनी यापूर्वी आरक्षणाला विरोध दर्शविला होता, असा दावा केला. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ते भाजपमध्ये सामील होत आहेत आणि पक्षात त्यांचे स्वागत केले जात आहे, असेही ते म्हणाले.
दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील दमण येथे प्रचार सभेत राहुल म्हणाले की, आरएसएस आणि भाजप त्यांच्या नेत्यांना देशाचे राजे बनवण्यासाठी आणि २०-२२ अब्जाधीशांना
मदत करण्यासाठी राज्यघटना आणि विविध संस्था गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पूर्वीच्या राज्याप्रमाणे देशावर राज्य करायचे आहे. त्यांना ‘एक देश, एक भाषा आणि एक नेता’ अशी व्यवस्था हवी आहे.
राज्यघटना नष्ट करण्याची विचारधारा
nकाँग्रेस आणि आरएसएस-भाजप यांच्यातील लढाई ही वैचारिक आहे, असे सांगून राहुल यांनी लोकांना राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
“राज्यघटनेने पाया म्हणून काम केले आहे, त्या बीजातूनच या संस्था उदयास आल्या आहेत. त्यांना राज्यघटना, लोकशाही आणि विविध संस्था नष्ट करायच्या आहेत. मूलभूत स्तरावर आरएसएस आणि भाजपची विचारधारा राज्यघटना नष्ट करण्याची आहे, तर काँग्रेसला तिचे संरक्षण करायचे आहे,” असे ते म्हणाले.
मागील १० वर्षांत मोदी सरकारने आरक्षण कमकुवत करण्यासाठी खासगीकरणाचा सपाटा लावला. '४०० पार'मागील हेतू तोच आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास ते आरक्षण रद्द करण्याचा खुलेआम प्रयत्न करतील. - जयराम रमेश, महासचिव, कॉंग्रेस