संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:53 PM2024-07-03T16:53:52+5:302024-07-03T16:55:37+5:30
Narendra Modi Vs Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी केलेले घणाघाती आरोप आणि नरेंद्र मोदी यांनी दिलेलं प्रत्युत्तर यावरून दोन्हीकडून वेगवेगळे दावे केले जात असताना आता भाजपाने सोशल मीडियावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे सभागृहातील व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवे सरकार स्थापन झाल्यानंतर झालेले अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कमालीचे वादळी ठरले. विशेषत: विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अधिकच आक्रमक झालेले राहुल गांधी हे बहुमत हुकल्यानंतर मित्रपक्षांच्या मदतीने पंतप्रधानपदी आलेल्या नरेंद्र मोदी यांची सभागृहात कोंडी करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणांची चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी केलेले घणाघाती आरोप आणि नरेंद्र मोदी यांनी दिलेलं प्रत्युत्तर यावरून दोन्हीकडून वेगवेगळे दावे केले जात असताना आता भाजपाने सोशल मीडियावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे सभागृहातील व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भाजपाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या लोकसभेच्या सभागृहातील वर्तनाचे व्हिडीओ शेअर करत दोन्ही नेत्यांच्या संस्कारांची तुलना केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यास सुरुवात केल्यावर विरोधी पक्षांचे खासदार त्यांच्यासमोर येऊन घोषणाबाजी करू लागले. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी करत असलेल्या एका खासदाराला पिण्यासाठी पाणी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहातील वातावरण तापलेलं असताना राजकारणापलिकडे जात दाखवलेल्या संस्कारांचं उदाहरण देत सोशल मीडयावर राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
तर भाजपाने राहुल गांधी यांचाही नरेंद्र मोदी यांच्यां लोकसभेतील भाषणादरम्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी हे वारंवार अस्वस्थ झालेले दिसत होते. तसेच मोदींच्या भाषणादरम्यान, ते विरोधी पक्षांच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोरील वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करण्यासाठी चिथावणी देत असल्याचे दिसत होते. त्यावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना ताकिदही दिली होती.
संस्कार अपने-अपने... pic.twitter.com/e1vYRl6qJa
— BJP (@BJP4India) July 3, 2024
हे दोन्ही व्हिडीओ भाजपाने आपल्या अधिकृत अकाउंटवरून एकत्रितपणे शेअर केले आहेत. तसेच त्याला संस्कार आपापले असे नाव दिले आहे. दरम्यान, हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर समर्थक आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.