गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती करू, मलाही दिले गेले होते संकेत; सत्यपाल मलिक यांनी पुन्हा उडवली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 07:06 PM2022-09-10T19:06:09+5:302022-09-10T19:06:50+5:30
भाजपमध्ये अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटी छापे टाकू शकतात. सरकारने या भाजपच्या लोकांवरही छापे टाकावेत - मलिक
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. मीही गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती बनवतो, असे संकेत मलाही मिळाले असल्याचे ते म्हणाले. “पण मी म्हणालो, मी ते करू शकत नाही. भाजपमध्ये अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटी छापे टाकू शकतात. सरकारने या भाजपच्या लोकांवरही छापे टाकावेत,” असेही ते म्हणाले. राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण शेतकऱ्यांमध्येही जाणार असल्याचेही मलिक म्हणाले.
सत्यपाल मलिक हे राजस्थान दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. जगदीप धनखड या पदासाठी पात्र आहेत. परंतु मी जर गप्प राहिलो तर मलाही उपराष्ट्रपती केलं जाईल असे संकेत मला देण्यात आले होते. परंतु मी असं करणार नाही असं सांगितलं असं बोलताना ते म्हणाले. “जे मला वाटतं ते मी बोलतो, मग यासाठी काहीही करावं लागू द्या, देशही सोडावा लागो. भाजपत. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर ईडी, आयटी आणि सीबीआयचे छापे पडायला हवे होते. परंतु असं झालं नाही. हेच कारण आहे ज्यामुळे या संस्थांबाबत देशात वेगळं वातावरण तयार झालं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
राहुल गांधींचं कौतुक
यावेळी बोलताना मलिक यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलं. “एक तरूण आपल्या पक्षासाठी काम करतोय हे चांगलं आहे. एक नेता पायी चालतोय, आजकाल असं कोणीही करत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेतून काय संदेश जातोय ते जनताच सांगेल. परंतु त्यांना हे काम ठीक वाटत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वीही केली होती टीका
यापूर्वी सत्यपाल मलिक यांनी अनेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. दरम्यान, यापूर्वी मलिक यांनी राहुल गांधींचे केवळ कौतुकच केले नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मलिक यांनी निशाणा साधत पंतप्रधान मोदी प्रत्येक तिसऱ्या दिवशी काहीतरी उद्घाटन करत असतात. कदाचित त्या दिवशी काहीच नसेल म्हणून त्यांनी राजपथाचं नाव बदललं असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
राजपथाचं नाव बदलण्याची गरज नव्हतं. जरा त्यांनी दावा केला होता हे नाव देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं, इंग्रजांनी नाही, असंही मलिक म्हणाले होते. पंतप्रधान प्रत्येक तिसऱ्या दिवशी उद्घाटन करत असतात. कदाचित गुरूवारी काहीही ठरवण्यात आलं नव्हतं. म्हणून राजपथाचं नाव बदललं आणि त्यांनी याचं उद्घाटन केलं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.